नवी दिल्ली - 23 मार्च 1931 रोजी क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यासाठी हे तिघंही जण हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. शहीद झाले त्यावेळी भगत सिंग आणि सुखदेव हे 23 वर्षांचे आणि राजगुरू 22 वर्षांचे होते. भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं.
23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी जवळपास 7.33 वाजण्याच्या सुमारास भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली. फाशीपूर्वी भगत सिंग यांना अखेरची इच्छा विचारण्यात आली होती. त्यावेळी ते सिंग लेनीन यांचे आत्मचरित्र वाचत होते. वाचन पूर्ण करण्यासाठी सिंग यांनी कारागृह प्रशासनाकडे वेळ मागितला. यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी त्यांना फाशीची वेळ झाल्याचे सांगितले असता सिंग म्हणाले होते की, जरा थांबा. आधी एका क्रांतिकारकाला दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट तरी घेऊ दे. यावेळी तिघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. फासावर जाताना तिघंही 'मेरा रंग दे बसन्ती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसन्ती चोला, माय रंग दे बसन्ती चोला' हे देशभक्ती गीत गात होते.
28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील लायलपूर येथे आर्यसमाजातील एका कुटुंबात भगत सिंग यांचा जन्म झाला होता. स्वातंत्र्याची लढाई लढण्यात सहभागी होणाऱ्या प्रमुख कुटुंबांपैकी त्यांचे एक कुटुंब होतं. ज्यावेळी भगत सिंग यांचा जन्म झाला त्याच दिवशी त्यांच्या वडील व काकांची कारागृहातून सुटका झाली होती. भगत सिंग यांच्यावर लहानपणीच देशप्रेमाचे संस्कार करण्यात आले होते. त्यांचे वडील व काका गदर पार्टीचे सदस्य होते. गदर पार्टीचे नेते हरदयाल आणि कर्तार सिंग सराभा हे त्यांचे आदर्श होते. 1923 मध्ये भगत सिंग यांनी लाहोर नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. आपल्या साथीदारांसोबत मिळून त्यांनी 1926 साली नौजवान भारत सभेची स्थापना केली. यानंतर ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये प्रमुख सदस्य म्हणून सहभागी झाले. सॉन्डर्स हत्याप्रकरणी सुखदेव, राजगुरू आणि भगत सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.