शहीद स्मारकाचे उद्या लोकार्पण --- मस्ट
By admin | Published: August 08, 2015 12:23 AM
- हुतात्म्यांना नमन : युवा पिढीचे प्रेरणास्थान
- हुतात्म्यांना नमन : युवा पिढीचे प्रेरणास्थान नागपूर : नासुप्रतर्फे झिरो माईल जवळ उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने उपस्थित राहतील. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक हुतात्म्यांनी प्राणांची अहुती दिली. यात नागपुरातील १०० हून अधिक हुतात्म्यांचा समावेश होता. शहिदांच्या स्मृतींना नमन करण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून नागपुरात एक शहीद स्मारक उभारले जावे, यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे आग्रही होते. तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी राज्य शासनाकडे संबंधित विषय लावून धरत शहीद स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये नागपूर त्रिशताब्दी महोत्सवात राज्य शासनाने या स्मारकासाठी ६० लाख रुपये निधी मंजूर केला. पण, स्मारक नेमके कुठे उभारायचे यासाठी जागा निश्चित होत नव्हती. अनेक अडचणी येत होत्या. श्याम वर्धने हे महापालिका आयुक्त असताना काही वेळ त्यांच्याकडे नासुप्र सभापतिपदाचा कार्यभारही होता. त्यावेळी वर्धने यांनी मॉरिस कॉलेज होस्टेल परिसरातील ही जागा निश्चित केली. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. काही महिन्यांपूर्वी नासुप्रने कामाला सुरुवात करून आता स्मारक लोकार्पणासाठी सज्ज केले आहे. या कामावर एकूण १ कोटी २० लाख रुपये खर्च झाला आहे. लागलेला अतिरिक्त ६० लाख रुपयांचा खर्च नासुप्रने स्वत:च्या निधीतून केला आहे.