नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमधील शहिदांच्या मृतदेहासोबत विटंबना झाल्याचा आरोप केला जात आहे. शहिदांचा मृतदेह तिरंग्याच्या जागी प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि कागदी बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचे फोटो समोर आल्यापासून वादाला सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीरने ट्वीटकरून ही लाजीरवाणी घटना असल्याचं म्हटलं आहे. वाढता वाद पाहता लष्कराने ट्वीट करून ''शहिदांना नेहमीच सन्मान दिला जातो, पण ही नेहमीप्रमाणे मिळणारी वागणूक नव्हती...'' हे मान्य केलं आहे.
भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी अरुणाचल प्रदेशमध्ये तवांगजवळ कोसळले. या दुर्घटनेत एअर फोर्सच्या सात जवानांचा मृत्यू झाला. माजी कमांडर लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग यांनी रविवारी एक फोटो ट्वीट केला. यामध्ये शहिदांचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि कागदी बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचं दिसत होतं. काल सात जवान घरातून मातृभूमीचं रक्षण करण्यासाठई घरातू निघाले होते....आणि अशाप्रकारे ते घरी परतले...असं ट्वीट त्यांनी केलं.
फोटो समोर आल्यानंतर गौतम गंभीरने ही घटना लाजीरवाणी असल्याचं ट्वीट केलं.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्वीटकरून शहिदांचे कागदाच्या बॉक्समधले फोटो पाहून धक्का बसला...आपण आपल्या शहिदांना अशी वागणूक देतो का? ... असा प्रश्न विचारला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत असून अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणेच आपण आपल्या शहिदांना अशी वागणूक देतो का? हा प्रश्न सोशल मीडियावर अनेकजण विचारत आहे.