शाहजहांपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील एका उमेदवारांने चक्क स्वत: नवरदेवाच्या वेशात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्याने घोडावर बसून बँड बाजा वाजवत वरात सुद्धा काढली.
वैद्यराज किशन असे या उमेदवाराचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीसाठी संयुक्त विकास पार्टीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यराज किशन आले होते. यावेळी त्यांनी नवरदेवाच्या वेशभूषेत येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच, त्यांनी घोडावर बसून बँड बाजा वाजवत वरात काढली. दरम्यान, वैद्यराज किशन यांनी याविषयी बोलताना पत्रकारांना सांगितले की, 'आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे मी नवरदेवाच्या वेशात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहे.'