Sameer Wankhede: कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या इशाऱ्यावरून किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एनसीबीच्या विशेष तपास विभागाने एक अहवाल सादर केला असून त्यामधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
इन्कम टॅक्स रिटर्ननुसार, समीर वानखेडे यांचे वार्षिक सरासरी उत्पन्न १५.७५ लाख रुपये आहे. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे उत्पन्न सुमारे ७ लाख रुपये आणि वडिलांचे उत्पन्न पेन्शन आणि भाडे मिळून सुमारे ३.४५ लाख रुपये आहे. सन २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या काळात समीर वानखेडे यांनी कुटुंबासह ब्रिटन, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांमध्ये सहा खासगी परदेश दौरे केले. या ५५ दिवसांच्या परदेश दौऱ्यात त्यांनी ८.७५ लाख रुपये खर्च केले. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे ही रक्कम केवळ विमान प्रवासाच्या खर्चाची असल्याचे समोर आले आहे.
समीरच्या कुटुंबीयांनी सुमारे ७.५ लाख रुपये रोख दिले
विशेष तपास पथकाने केलेल्या तपासानुसार, समीर वानखेडे आणि त्याचा मित्र विरल जमालुद्दीन हे जुलै २०२१ मध्ये ताज एक्झोटिका मालदीव येथे कुटुंबियांसोबत थांबले होते. यादरम्यान समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी सुमारे ७.५ लाख रुपये रोख दिले. १८ डिसेंबर २०२१ रोजी विरलच्या क्रेडिट कार्डने हॉटेलचे पैसे दिले. तसेच समीर वानखेडे यांनी २२ लाख रुपये किमतीचे रोलेक्स घड्याळ खरेदी केले. याबाबत त्यांनी कोणतीही माहिती संबंधित विभागाला दिली नाही. समीर वानखेडे यांनी आपल्या परदेश दौऱ्यांबाबत आणि महागड्या घड्याळ्यांच्या खरेदीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. समीर वानखेडे यांनी अनेकवेळा परदेशात खासगी भेटी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या काळात तो कोणत्या देशात राहिले, याबाबतही माहिती दिली नाही. यासंदर्भातील वृत्त आजतकने दिले आहे.
दरम्यान, समीर वानखेडे यांनी परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चाची चुकीची माहिती दिली, असा दावा अहवालात करण्यात आलेला आहे. समीर वानखेडे यांनी विरल रंजनला ४ ब्रँडेड घड्याळे ७ लाख ४० हजार रुपयांना विकली. हे पेमेंट चेकद्वारे करण्यात आले. हे चेकबुक क्रांती रेडकरचे होते, असे समोर आले असून, या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. एवढेच नव्हे तर समीर वानखेडे यांचे मुंबईत चार फ्लॅट असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मुंबईत त्यांच्या नावे सहा मालमत्ता असून ते वडिलोपार्जित मालमत्ता आहेत, असेही अहवालातून स्पष्ट झाले आहे.