ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - कोलकाता नाईट रायडर्सच्या शेअर विक्रीत परकीय चलन कायद्याचा उल्लंघन केल्याप्रकऱणी अभिनेता शाहरुख खान अडचणीत सापडला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शाहरुखला समन्स बजावले असून आता शाहरुखला महिना भराच्या आत ईडीसमोर हजेरी लावावी लागणार आहे.
आयपीएलच्या दुस-या हंगामात शाहरुख खानच्या केकेआरमधील दोन कोटींपैकी ९० लाख रुपयांचे शेअर्स जुही चावला व तिचा पती जय मेहतांकडे होते. काही दिवसांनी जूहीने तिच्याकडील ४० लाख रुपयांचे शेअर्स तिच्या पतीला विकले. बाजारभावानुसार शेअर्सचे दर ६० ते ७० रुपये असताना ते अवघ्या ६ किंवा ७ रुपये या दराने विकण्यात आले होते. या सर्व व्यवहारात परकीय चलन कायद्याचा उल्लंघन झाल्याचा आरोप असून याप्रकरणी ईडीने शाहरुखला समन्स बजावली आहे. याप्रकरणात आता शाहरुखची कसून चौकशी होण्याची चिन्हे आहेत. चार वर्षांपूर्वीही ईडीने शाहरुखला नोटिस बजावत त्याची चौकशी केली होती.