ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. ४ - शाहरूख खानच्या असहिष्णूतेसंदर्भातल्या वक्तव्यावरून देशभरात वाद विवाद निर्माण झाले असतानाच माहिरा खानच्या एका फोटोमुळे शिवसेना दुखावली जाण्याची शक्यता असून ती शाहरूखसाठी नवी डोकेदुखी ठरू शकते.
माहिरा खानने पाकिस्तानी दिग्दर्शक असीम रझा याच्यासोबत एक फोटो काढून घेतला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरत आहे. या फोटोमध्ये असीम रझा केवळ शिवसेनेची ओळख झालेल्या भगव्या कपड्यातच नाही तर त्याचा अवतार शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्याशी साधर्म्य दाखवणारा आहे आणि त्याच्या हातात माहिरा को बाहर निकालो असा फलक आहे.
पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू न देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेची खिल्ली उडवणारा हा फोटो आहे. रईस या शाहरूखच्या चित्रपटात माहिरा ही मुख्य हिरॉइन असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यावेळी शिवसेना काय भूमिका घेते हा प्रश्न आहेच, पण त्याआधी शाहरूखने जाहीरपणे कलाकारांसाठी अशी बंधने नसावीत, त्यांना काम करू द्यावे अशी भूमिका घेतली आहे.
गुलाम अलींचा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे मुंबईत रद्द झाला तर आता तो दिल्लीतही पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे.
भाजपाच्या नेत्यांनी शाहरूखविरोधात गरळ ओकले, हाफिज सईदने तर चक्क शाहरूखला पाकिस्तानात स्थलांतर करण्याचे निमंत्रण दिले आणि आता शाहरूखच्या हिरॉइनने माहिराने हा फोटो काढून घेतलाय.
शिवसेना या फोटोकडे केवळ एक गंमत म्हणून दुर्लक्ष करते की गंभीरपणे घेऊन माहिराच्या सिनेमांना भारतात प्रदर्शित करण्यास विरोध करते हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. रईस पुढच्या वर्षी ईदच्या सुमारास प्रदर्शित होणार आहे.