कोलकाता : भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कूचबिहारहून प्रस्तावित असलेल्या ‘रथयात्रे’ला पश्चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली आहे. यामुळे धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो, असे कारण राज्य सरकारने दिले आहे. राज्य सरकारने परवानगी नाकारल्याने भाजपाने न्यायालयात धाव घेतली आहे.राज्य सरकारचे महाधिवक्ता किशोर दत्ता यांनी उच्च न्यायालयास सांगितले की, कूचबिहारच्या पोलीस अधीक्षकांनी या रथयात्रेला परवानगी देण्यास नकार दिला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यात ‘लोकशाही वाचवा रॅली’चे आयोजन केले आहे. यात तीन रथयात्रांचा समावेश आहे. या रथयात्रांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, असे राज्य सरकारने म्हटले आहे.भाजपाने न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती यांच्या पीठासमोर सांगितले आहे की, आम्ही शांततेत यात्रा करणार आहोत. भाजपाने उत्तर कूचबिहारपासून ७ डिसेंबर रोजी ही मोहीम सुरू करण्याचे ठरविले आहे. ९ रोजी दक्षिण परगना जिल्हा आणि १४ रोजी बीरभूमी जिल्ह्यातील तारापीठ मंदिरातून रथयात्रा सुरू करण्याचे पक्षाने ठरविले आहे. (वृत्तसंस्था)
शहा यांच्या रथयात्रेला प. बंगाल सरकारने परवानगी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 6:32 AM