- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची पुढच्या आठवड्यात कोणत्याही क्षणी पक्षाध्यक्षपदी फेरनिवड केली जाण्याची शक्यता आहे. किमान १२ राज्यांमधील पक्ष संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि उर्वरित पाच राज्यांमधील संघटनात्मक निवडणुकाही लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुकीतील दारुण पराभवानंतर अमित शहा यांना हटवून त्यांच्या जागी नवा पक्षाध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता असल्याचे भाजपच्या गोटात मानले जात होते; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर शहा यांना हटविण्याचा विचार बाजूला ठेवण्यात आला. राजनाथसिंग किंवा नितीन गडकरी यापैकी कुणालाही पक्षाच्या कामासाठी सोडण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची तयारी नाही. त्यामुळे शहा यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, अशी मोदींची इच्छा आहे. तथापि, समेट घडवून आणण्याचा एक भाग म्हणून पक्ष संघटनात्मक बदल करताना काही ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनांनाही उचित महत्त्व दिले जाणार आहे.सरकारमध्ये खांदेपालट करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या खांद्यावर एखादी अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे नागरी उड्डयन खात्याचा अतिरिक्त कारभार सोपविला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. गडकरी यांना रेल्वे मंत्रिपद दिले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती; परंतु पंतप्रधान मोदी हे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कामगिरीबाबत समाधानी असल्याने ही शक्यता कमी आहे. गडकरी यांची त्यांच्या मंत्रालयातील कामगिरी कौतुकास्पद राहिलेली आहे. गडकरी हे नागपूरचे आहेत आणि ते सरसंघचालक मोहन भागवत यांचे विश्वासू मानले जातात. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलपंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत. अमित शहा यांची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर लगेच ही प्रक्रिया प्रारंभ होईल. दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करून त्यात शहा यांच्या फेरनिवडीची घोषणा केली जाणार असल्याचे समजते. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना बिहारचे प्रतिनिधित्व कमी करून २०१६-१७ मध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांना जादा प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.