Rahul Gandhi Shakti Statement Row: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील INDIA आघाडीच्या सभेत 'शक्ती' शब्दावरुन भाजपवर घणाघाती टीका केली होती. त्यावरुन आता भाजपने बुधवारी (20 मार्च, 2024) राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपने राहुल गांधींनी माफी मागण्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली.
भाजपने तक्रारीत काय म्हटले?निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरदीप सिंग पुरी म्हणाले, मी राहुल गांधींचे संपूर्ण भाषण ऐकले. त्यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य करणे, अतिशय लज्जास्पद आहे. दरम्यान, हरदीप सिंग पुरी यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी EVM विरोधातही वक्तव्य केले आहे. ठराविक समाजाला खूश करण्यासाठी असे वक्तव्य केमुळे देशातील शांततापूर्ण वातावरण बिघडू शकते. या तक्रारीत त्यांनी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप मुंबईतील शिवाजी पार्कवर झाला. मंचावर इंडिया आघाडीतील सर्व पक्ष उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, हिंदू धर्मात शक्ती हा शब्द आहे. आम्ही या शक्तीविरोधात लढत आहोत. इथे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे राजाचा आत्मा EVM मध्ये आणि भारतातील प्रत्येक केंद्रीय तपास संस्थेत आहे, अशाप्रकारची टीका राहुल यांनी सभेतून केली होती.