Unparliamentary Words: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचे पावसाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. संसेदच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून 'असंसदीय' शब्दांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शब्दांचा वापर सभागृहाच्या कामकाजात आता सदस्यांना करता येणार नाही. विशेष बाब म्हणजे या यादीत भ्रष्ट, जुमलाजीवी, तानाशाह, कमीना, दलाल, घड़ियाली आंसू, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप अशा प्रकारच्या शब्दांचा समावेश आहे. विरोधी पक्षातील नेतेमंडळी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना यातील बरेचसे शब्द वापरतात. मात्र आता असे शब्द वापरता न आल्यास ही विरोधकांची गळचेपी असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत यादी स्वीकारण्यास नकार दिला आहे. "संसदेचे अधिवेशन काही दिवसांत सुरू होणार आहे. खासदारांवर बंदी घालणारा आदेश जारी करण्यात आला आहे. आता संसदेत भाषण करताना हे मूळ शब्द वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. मी लज्जास्पद, दुर्व्यवहार, शिवीगाळ, फसवणूक, भ्रष्ट, दांभिक, अक्षम हे शब्द वापरणारच. मला निलंबित करा, पण मी लोकशाहीसाठी लढणार", असे ते म्हणाले.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही ट्विट केले. 'मोदी सरकारचे सत्य लपवण्यासाठी विरोधकांनी वापरलेले सर्व शब्द आता 'असंसदीय' शब्दांच्या श्रेणीत टाकण्यात आले आहेत, अशी टीका त्यांनी केली. कोणते शब्द असंसदीय हे संसदेतील पुस्तकावर अवलंबून असते. त्यावर तसा निर्णय घेतला जातो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संसदीय कारकिर्दीत वापरलेले शब्द आम्ही वापरणार आहोत. त्यांनी वादविवादात कोणते शब्द वापरले ते आम्ही आठवण करून देऊ. त्यांनी स्वत: हे शब्द वापरले आहेत तर मग त्यांना ते आता चुकीचे वाटतात, असा सवाल काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना विचारला.