नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. शंभू सीमेसह इतर सर्व सीमा खुल्या करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गौरव लुथरा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही मागणी केली आहे. गौरव लुथरा हे पंजाबचे रहिवासी आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, पंजाब सरकार आणि हरयाणा सरकारला सर्व राज्यांच्या सीमा खुल्या करण्याचे आदेश द्यावेत. सीमा बंद करणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, गेल्या शुक्रवारी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 101 शेतकऱ्यांच्या समूहाने रविवारी पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंजाबच्या सीमेवर हरयाणाच्या सुरक्षा जवानांनी आंदोलकांवर अश्रुधुराचे नळकांडे आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला. यावेळी जवळपास नऊ शेतकरी जखमी झाल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.यानंतर शेतकऱ्यांचा दिल्लीकडे निघणारा मोर्चा आज तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
सोमवारी पुन्हा शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे. पंजाबचे शेतकरी नेते सर्वन सिंग पंधेर यांनी सांगितले की, किमान नऊ शेतकरी जखमी झाले असून त्यापैकी एकाला चंदीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिंधू सीमेवर सर्वन सिंग पंधेर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या समूहाला परत बोलावले आहे. सोमवारी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाची बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.