लाजिरवाणी घटना! कुत्र्यांच्या लहान पिलांना जाळून तर त्यांच्या आईला विष देऊन मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 08:01 PM2022-12-05T20:01:04+5:302022-12-05T20:01:31+5:30
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही तपासले जात आहेत.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तीन कुत्र्यांच्या पिले आणि त्यांच्या आईच्या हत्येप्रकरणी एमपी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कुत्र्यांच्या पिलांना जाळून तर त्यांच्या आईला विष देऊन मारले. प्राण्यांवर अत्याचाराची अत्यंत गंभीर घटना रविवारी घडली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजधानीतील चिनार पार्क रोजप्रमाणे गजबजले होते, मॉर्निंग वॉकला आलेले लोक फिरत होते. यावेळी तिथे उपस्थित लोकांना तीन पिल्ले आणि एक कुत्रिचा मृतदेह आढळला. सुरुवातीला कुत्र्यांचा सामान्य मृत्यू झाल्याचे वाटले, पण प्राणीप्रेमींना हे वेगळेच प्रकरण असल्याचे जाणवले. संशयाच्या आधारे त्यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आणि तपासात मादी कुत्र्याच्या अंगावर निळ्या रंगाच्या खुणा असल्याचे आढळून आले. तसेच, जवळच तिच्या तीन पिलांचे जळालेले मृतदेहही पडले होते.
यानंतर घटनेची माहिती एमपी नगर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मादी कुत्र्याची तपासणी केली. मादी कुत्र्याला विष देऊन ठार केल्याचे तपासात समोर आले आहे. एमपी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुधीर अर्जरिया यांनी सांगितले की, अशाप्रकारची हृदयद्रावक घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. तक्रार मिळाल्यानंतर अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम 429 आणि प्राणी क्रूरता कायद्याच्या कलम 13 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिनार पार्कमधील दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात असल्याचे सुधीर अरजारिया यांनी सांगितले.