नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वेगाने लसीकरण सुरू आहे. भारतात दर दिवशी सरासरी 30 लाख 93 हजार 861 जणांचं लसीकरण सुरू आहे. तर आतापर्यंत देशात 8 कोटी 70 लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात शुक्रवारी आरोग्य विभागाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. कोरोना लसीकरणावर करोडो रुपये खर्च केले जात असताना घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शामली येथील एका आरोग्य केंद्रावर तीन वृद्ध महिला कोरोना लस (Corona Vaccine) घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना न विचारताच या वृद्ध महिलांना अॅन्टी रेबीज लस (Anti Rabies Vaccine) दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. यातील एका महिलेची प्रकृती बिघडली असून त्या अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. वृद्ध महिलांच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर गोंधळ घातला. तसेच कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.
कांधला निवासी असलेल्या सरोज (70), अनारकली (72) आणि सत्यवती (60) या तिन्ही महिला कोरोनाची लस घेण्यासाठी गेल्या होत्या. येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी बाहेरील मेडिकल स्टोअरमधून दहा- दहा रुपयांच्या सिरिंजची मागणी केली आणि तिघींनाही लस देऊन घरी जाण्यास सांगितलं.काही वेळाने सरोज यांना चक्कर येऊ लागली आणि अस्वस्थ वाटू लागलं. कुटुंबीयांनी त्यांना खासगी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांना चिठ्ठी दाखवल्यानंतर लक्षात आलं, की त्यांना कोरोना नाही तर अॅन्टी रेबीज लस देण्यात आली आहे. अन्य दोन वृद्ध महिलांनाही याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही लसीची चिठ्ठी दाखवली. यावेळी समोर आली की त्यांनाही अॅन्टी रेबीज लस देण्यात आली आहे.
पीडितांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केली असून ज्यांनी चुकीची लस दिली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. सध्या शामलीचे डीएम जसजित कौर यांनी संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली आहे. डीएमनं सीएमओ आणि एसीएमओ यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपवला आहे. चौकशीनंतर दोषी आरोग्य कर्मचार्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारीच! कोरोना लस घेतल्यानंतर मोदी सरकार देणार 5000 रुपये; पण करावं लागणार 'हे' खास काम
कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. केंद्र मोदी सरकारने देखील कोरोना लसीसकरणासंदर्भात देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. ज्यामध्ये कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार 5000 रुपये देणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी काही नियम आहेत तसेच प्रोसेस देखील आहे. केंद्र सरकारच्या mygov.in या वेबसाईटवर या कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे.