लोकमत न्यूज नेटवर्ककानपूर : पाकिस्तानातील तुरुंगात हेरगिरीच्या आराेपाखाली ८ वर्षे काढल्यानंतर ७० वर्षीय शमसुद्दीन अखेर भारतात घरी परतले. कुटुंबीयांसाेबत त्यांची तब्बल २८ वर्षांनी भेट झाली. यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्या.
शमसुद्दीन हे मुळचे कानपूर येथील रहिवासी. त्यांचा जाेडे तयार करण्याचा व्यवसाय हाेता. काही नातेवाईकांसाेबत भांडण झाल्यानंतर ते १९९२ मध्ये भारत साेडून पाकिस्तानात ९० दिवसांच्या व्हिसावर गेले. काही दिवसांनी त्यांनी कुटुंबीयांना कानपूर येथे परत पाठविले. त्यांना २०१२ मध्ये हेरगिरीच्या आराेपांवरून अटक करण्यात आली हाेती.
जवळपास ८ वर्षे खटला चालला. या काळात त्यांना लाहाेर येथे तुरुंगात बंदिस्त ठेवण्यात आले हाेते. शमसुद्दीन यांची सर्व आराेपांमधून निर्दाेष मुक्तता झाली आणि २६ ऑक्टाेबरला त्यांची तुरुंगातून सुटका झाली. तेथून भारतात आल्यानंतर त्यांना अमृतसर येथे विलगीकरणात ठेवण्यात आले हाेते. त्यानंतर उत्तर प्रदेश पाेलीस त्यांना घेऊन कानपूर येथे पाेहाेचले. कुटुंबीयांकडे साेपविण्यापूर्वी त्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले.
घरी पाेहाेचल्यानंतर शमसुद्दीन यांनी पाणावलेल्या डाेळ्यांनी सांगितले, ‘आपला देश सर्वाेत्तम आहे. मी तिथे जाऊन चूक केली. भारतीय निर्वासितांना तिथे नीट वागणूक मिळत नाही. शत्रूसारखे ते भारतीयांना वागणूक देतात. ही दिवाळी संस्मरणीय राहील. तुरुंगात मी खूप काही सहन केले आहे. स्वतंत्रतेपक्षा माेठी दिवाळीची भेट असूच शकत नाही.’
बहिणीची शुद्ध हरपलीशमसुद्दीन यांना पाहताच त्यांची बहिण शबीना यांची शुद्ध हरपली. दाेन्ही मुलींना रडू काेसळले. शमसुद्दीन यांना शेवटचे पाहिले त्यावेळी त्या तीन आणि चार वर्षांच्या हाेत्या. हा त्यांच्यासाठी भावनिक क्षण हाेता. कुटुंबीयांच्या प्रार्थनांना यश मिळले.