अहमदाबाद - माजी काँग्रेस नेता शंकर सिंह वाघेला यांनी आगामी चित्रपट 'पद्मावती' रिलीज करण्याआधी हिंदू आणि क्षत्रिय समाजाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे. जेणेकरुन चित्रपटात सत्य घटनांसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आली नसल्याची खात्री करण्यात येईल, आणि तसं न केल्यास हिंसक प्रदर्शन करण्यात येईल अशी धमकीच शंकर सिंह वाघेला यांनी दिली आहे.
शंकर सिंह वाघेला बोलले आहेत की, 'चित्रपट 1 डिसेंबर रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेता दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी हिंदू आणि क्षत्रिय नेत्यांना चित्रपट दाखवावा. चित्रपटात सत्य घटनांसोबत छेडछाड करण्यात आली असल्याचा लोकांना संशय आहे'. चित्रपटात दीपिका पदुकोन, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर मुख्य भुमिकेत आहेत. 1 डिसेंबर रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.
'चित्रपटाची प्रसिद्धी व्हावी यासाठी ऐतिहासिक घटनांसोबत छेडछाड करुन आपल्या मनाप्रमाणे लोकांसमोर सादर करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही', असंही शंकर सिंह वाघेला बोलले आहेत. 'जर चित्रपटाचं प्री-स्क्रिनिंग न करताच रिलीज करण्यात आला, तर गुजरातमध्ये हिंसक निदर्शनं केली जातील ज्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. जर लोकांनी कायदा हाती घेतला तर त्यासाठी मी आत्ताच चित्रपटगृह मालकांची माफी मागतो'.
‘पद्मावती’च्या निमित्ताने निर्माण झालेले वाद सध्या तरी थांबायचे नाव घेत नाहीयं. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या सूरत येथील एका शॉपिंग मॉलमध्ये ‘पद्मावती’च्या पोस्टरची शानदार रांगोळी साकारण्यात आली होती. पण एका हिंदूत्ववादी संघटनेच्या मूठभर लोकांनी काही क्षणात या रांगोळीची नासधूस करत, ती नष्ट केली होती. या घटनेमुळे ‘पद्मावती’त राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण कमालीची संतापली होती. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईराणी यांना टॅग करत, सोशल मीडियावर या घटनेविरोधातील नाराजी तिने बोलून दाखवली होती. ‘हे असले प्रकार कुठेतरी थांबायला हवेत आणि कायदा हातात घेणा-यांविरोधात तातडीने कारवाई व्हायला हवी,’ अशी मागणी तिने केली होती. दीपिकाच्या या मागणीची गंभीर दखल घेत, पोलिसांनी गुरुवारी ही रांगोळी नष्ट करणा-या हिंदू युवा वाहिनीच्या १३ सदस्यांना अटक केली. या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
करण के या कलाकाराने दीपिका पदुकोणच्या ‘पद्मावती’ लूकमधील रांगोळी काढली होती. या रांगोळीसाठी त्याला तब्बल ४८ तास लागले होते.
महाराणी 'पद्मावती' यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून 'पद्मावती'ची भूमिका दीपिका पदूकोणने साकारली आहे. शाहीद कपूर राजा रतन सिंहच्या भूमिकेत असून रणवीर सिंहनं अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारली आहे.हा चित्रपट येत्या १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.