मुंबई - दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या तांडव या वेब सीरिजवरून गेल्या काही दिवसांपासून हिंदूंच्या भावना दुखावल्याचे सांगत मोठा वादंग सुरू आहे. काही ठिकाणी या वेब सीरिज विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशात या वेब सीरिजचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकाविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तांडव या वेब सीरिजवरुन बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिनं आता संताप व्यक्त करत त्या वेब सीरिजमध्ये ती दृश्ये जाणूनबुजून टाकल्याचं म्हटलं. आता, रामायण मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनीही हा अधर्माचा तांडव असल्याचं म्हटलंय. तसेच, चारही धर्मपीठाच्या शंकराचार्यांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
तांडव वेब सिरीजबद्दल अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यानंतर तसंच विरोध वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या वेब सीरिजचा निर्माता अब्बास जफरने आपल्या संपूर्ण कास्ट आणि क्रूच्या बाजूनं सर्वांची माफी मागितली. तसेच कोणाचा अवमान करण्याचा किंवा कोणत्याही धर्म आणि राजकीय पक्षाचा अवमान करण्याचा आपला हेतू नव्हता, असेही त्यांनी माफी मागताना म्हटलं आहे. मात्र, यावरुन अनेकांनी निर्मात्याला लक्ष्य करत नाराजी व्यक्त केलीय. दिग्गज अभिनेता अरुण गोविल यांनीही हिंदुंच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचं म्हटलंय. गोविल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल मत मांडलंय.
आज क्रिएटीव्ह फ्रीडमच्या नावाखाली होत असलेल्या अधर्मी तांडवाला रोखण्याची गरज आहे. सर्वोच्च गुरुंचा दर्जा प्राप्त असलेल्या चारही धर्मपीठांच्या शंकराचार्यांनी एकत्र यावे. तसेच, सर्वच हिंदूंना एकत्र बांधून त्यांना आपली संस्कृती, आस्था आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी जागरुक करावे, असे आवाहन रामायणातील प्रभू श्रीराम म्हणजेच अरुण गोविल यांनी केलंय.
चौकशी होणार
लखनौमध्ये अॅमेझॉन प्राईमच्या तांडव या वेब सीरिज विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यूपी पोलिसांच्या हुशार पोलीस अधिकाऱ्यांचे पथक पुढील कारवाईसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. लखनौच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात वेब सीरिजविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर चार पोलीस अधिकारी तपासासाठी मुंबईला रवाना झाले. हे अधिकारी वेबसीरिजचे निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांची चौकशी करू शकतात. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजमध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्याची दृश्ये आहेत. दुसरीकडे मिर्झापूरमध्ये वेब सीरिजविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.
सर्वच पातळीवर आपत्तीजनक
"समस्या केवळ हिंदू फोबिक कंटेंटची नाही. हे रचनात्मकपणेही खराब आहे. प्रत्येक पातळीवर ते आपत्तीजनक आहे. यासाठीच जाणूनबुजून वादग्रस्त दृश्ये ठेवण्यात आली आहेत. त्यांना ना केवळ गुन्हाच्या पार्श्वभूमीवर तर प्रेक्षकांना टॉर्चर केल्यामुळेही तुरुंगात टाकलं पाहिजे," असं कंगना म्हणाली. तिनं ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.