Narayan Rane Vs Shankaracharya: हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. यावरून विरोधक नारायण राणे यांच्यावर टीका करत आहे. तसेच नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणीही केली जात आहे. यासंदर्भात आता शंकराचार्यांनी प्रतिक्रिया दिली असून, नारायण राणे यांच्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.
ज्योतिष पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी नारायण राणे यांना उत्तर दिले. हजारो वर्षापासून देश गुलामित होता. पण तरीही आज सनातन धर्म टिकून आहे. नारायण राणे आपले माता-पिता, आजी-आजोबांसोबत सनातन धर्माच पालन करत आहेत, त्यामागे कुठली १०० वर्षांची संघटना किंवा ४५ वर्षांचा पक्ष नाहीय. हे अडीच हजार वर्षांपासूनच्या शंकराचार्यांच्या परंपरेमुळे शक्य झाले आहे, असे शंकराचार्य यांनी म्हटले आहे.
आम्ही फक्त आमच्या जबाबदारीच पालन करतो
आम्ही कुठे शाप दिलाय. आम्ही आतापर्यंत शाप शब्द उच्चारलेला नाही. आम्ही आशिर्वाद देतो. त्यांच्या पक्षालाही सगळे आशिर्वाद देत आहेत. ‘सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामया’ हा आमचा रोजचा पाठ आहे. आम्ही सगळ्यांना आशिर्वाद देतो. त्यात नारायण राणे आणि त्यांच्यासोबतचे लोक आहेत. जी धर्मशास्त्राची बाजू आहे, ती मांडणे आमची जबाबदारी आहे. आम्ही फक्त आमच्या जबाबदारीच पालन करत आहोत, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आम्ही सगळ्यांबद्दल बोलू शकत नाही. एक शंकराचार्य म्हणून सनातन धर्माच्या कुठल्याही आयोजनात शास्त्रीय पक्ष पाहणे, त्याची समीक्षा करणे आणि मार्गदर्शन ही जबाबदारी आहे. आम्ही त्याच जबाबदारीच पालन करत आहोत, असेही ते म्हणाले. अन्य शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच स्वागत आणि समर्थन केले. यावर बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, कोण काय करतय हे तुम्ही त्यांना विचारा. आम्ही त्यांचे प्रवक्ते नाहीत, त्यांच्या बाजूचे विश्लेषण करु शकत नाही.