अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. १६ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंत प्राणप्रतिष्ठपनेपूर्वीचे सर्व विधी पूर्ण केले जाणार आहेत. दरम्यान, देशातील चारही मठांच्या शंकराचार्यांनी या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला विरोध केल्याने एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले होते. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावरून सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, शारदा मठ, द्वारका येथील शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळा, या सोहळ्याची तिथी आणि मंदिराच्या बांधकामाबाबत मोठं विधान केलं आहे.
शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले की, रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेची ही तारीख सनातन धर्मासाठी शुभ लक्षण असल्याचे सांगितले. तसेच शंकराचार्यांनी मंदिराचं बांधकाम सुरू असलं, या सोहळ्यासाठी निवडलेली तिथी आणि नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठापना होणं, यापैकी कशालाही विरोध केला नाही. मात्र काही कारणास्तव आपण या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.
राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणार का? असं विचारलं असता शंकराचार्यांनी सांगितले की, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून आम्हाला निमंत्रण मिळालं आहे. तसेत या सोहळ्यामधून सनातन धर्माच्या अनुयायांची शेकडो वर्षांपूर्वीपासूनची इच्छा पूर्ण होत आहे. हा देशवासियांसाठी प्रसन्नतेचा विषय आहे. या सोहळ्याला उपस्थित राहणं तर शक्य होणार नाही. मात्र आम्ही दर्शन घेण्यासाठी नक्कीच जाणार आहोत. हे काम खरंतर आधीच व्हायला हवं होतं. अखेर आता हा क्षण आला आहे. परमात्म्याला ज्याच्याकडून जे काम करवून घ्यायचं असेल त्याच्याकडून ते काम करून घेतो, असे शंकराचार्य म्हणाले.
या पंतप्रधानांचं गर्भगृहात असणं शास्त्रानुसार आहे का, असं विचारलं असता त्यांनी सांगितले की, हा सोहळा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने आयोजित केला आहे. यावेळी देशात कुणाचंह सरकार असेल, त्या सरकारला या सोहळ्यामध्ये सहभागी करण्याची व्यवस्था करावी लागली असती. हे सरकारचं उत्तरदायित्व आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने हा निर्णय धर्मशास्त्रानुसारच घेतला असेल, असेही ते म्हणाले.