No Confidence Motion : शंकराचार्यांकडून राहुल गांधींच्या गळाभेटीचं कौतुक; भाजपाचे कान खेचले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 03:38 PM2018-07-23T15:38:02+5:302018-07-23T15:38:57+5:30
राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचे कौतुकही यावेळी केले आहे
नवी दिल्ली : शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती. राहुलच्या या झप्पीवर सर्वच स्तरातून समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. द्वारकाचे शंकराचार्य जगदगुरु स्वरूपानंद सरस्वती यांनी राहुल गांधीनी मोदींना दिलेल्या झप्पीचे समर्थन केले आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचे कौतुकही यावेळी त्यांनी केले आहे. ते वृंदावन येथे एका कार्यक्रमाला आले होते.
येथे बोलताना शंकराचार्य यांनी मोदी-योगी सरकरवर सडकून टीका केली. तर राहुल गांधींचे कौतुक केले. ते म्हणाले की, मोदींना व्यक्ती म्हणून विरोध नाही तर त्यांच्या धोरणाला विरोध असल्याचे राहुल गांधी यांनी गळाभेटीतून दाखवून दिले. त्याचप्रमाणे राहुल यांनी पप्पू म्हणणाऱ्याला विरोध न करता भाजपाच्या धोरणाला विरोध केला असल्याचा टोलाही यावेळी शंकाराचार्य यांनी अप्रत्येक्षरित्या भाजपाला लगावला.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपाच्या राम मंदिराच्या धोरणावरही टीका केली. ते म्हणाले की, भाजपाला राम मंदिर बांधायचे नाही, आगामी लोकसभा निवडणूकीत राम मंदिराच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचा विचार आहे. राम मंदिरावर भाजपा लोकांची दिशाभूल करत आहे. मोदी सरकार गोहत्या बंदीचा कायदा बनवू शकले नाही. याशिवाय कलम 370 आणि समान नागरि कायदाही आमंलात आणला नाही.