मुंबई - गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. पूर्वाश्रमीचे भाजपनेते अशी त्यांची ओळख आहे. त्याअगोदर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले होते. मात्र, 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला बाय केलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली असून स्वत:चे राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी ते राष्ट्रवादीत जाणार असल्याचं समजतंय. तर, वाघेला राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीला गुजरातमध्ये अच्छे दिन येतील, असेही म्हटलं जातंय.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शंकरसिंग वाघेला शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी याबाबत माहिती दिली. तसेच शरद पवारांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असेही बोस्की यांनी सांगितले. गुजरातमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी वाघेला यांनी स्वत:चा नवीन पक्ष स्थापन केला होता. मात्र, त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. तसेच भाजपमधूनही ते अधिकृतपणे बाहेर पडले आहेत. त्यामुळे स्वत:चे आणि मुलाचे राजकीय करिअर वाचविण्यासाठी ते घड्याळाचे टायमिंग साधणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला याचा किती फायदा होणार हे आगामी लोकसभा निवडणुकीत पाहता येईल. मात्र, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच वाघेला हे शरद पवारांच्या गोटात एंट्री करत आहेत. दरम्यान, पटेलांच्या माध्यमातून गुजरातमध्ये राष्ट्रवादी चांगलीच नावारुपाला असून तेथे त्यांचे अनेक क्षेत्रात नगरसेवकही आहेत. मात्र, आता वाघेलांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.