नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात धीरेंद्र शास्त्री यांची चर्चा रंगली आहे. हेच महाराज बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना बागेश्वर महाराज म्हणून देखील ओळखले जाते. खरंतर, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात याच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो वेळेत पारही पडला. पण, त्याच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आक्षेप घेतला गेला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्चांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेन्ज, यामुळे बागेश्वर महाराज नेहमीच सोशल मीडिया आणि समाज माध्यमांमध्ये ट्रेडिंगमध्ये असतात. याचदरम्यान शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी धीरेंद्र महाराजांच्या चमत्कार करण्याच्या विधानावर निशाणा साधला आहे. एकीकडे हिंदू संघटना बागेश्वर बाबाच्या समर्थनार्थ मैदानात उतरत असताना शंकराचार्यांनी मात्र बागेश्वर महाराजांना आव्हान दिले आहे.
कोरोना किंवा दहशतवादी हल्ल्याबाबत तुम्हाला आधीच का समजले नाही?; बागेश्वर महाराज म्हणतात...
उत्तराखंडमधील जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग चमत्कार खरे मानू असं ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी आव्हान दिलंय. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती दाखल झाले, त्यावेळी त्यांनी हे आव्हान दिलं आहे. चमत्कार दाखवणाऱ्यांनी आधी जोशीमठला यावं आणि भूस्खलन थांबवून दाखवावं. तसं केल्यास मग आम्ही त्यांचा जयजयकार करु, त्यांना वंदन करु असं शंकराचार्यांनी म्हटले आहे. चमत्कार करत असाल तर धर्मांतरण थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, शांतता प्रस्थापित करा, तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरा तर नमस्कार करू, असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.
नेमका वाद काय?
दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या धीरेंद्र महाराजांना श्याम मानव यांनी आव्हान दिलं होतं. अंनिसने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांच्याकडे असणारी दैवीशक्ती सर्वांसमोर दाखवा असं जाहीर आव्हान दिलं होतं. त्यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे कार्यक्रम अर्ध्यातच सोडून निघून गेले होते. त्यामुळं या प्रकरणाची खूप चर्चा रंगली होती.
कोण आहेत बागेश्वर महाराज?
बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. त्यांचा जन्म १९९६ साली त्यांचा झाला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालं आहे. हे त्यांच्या दिव्य दरबारामध्ये सनातन धर्माचा पुरस्कार करत हिंदूंच्या संरक्षणासाठी सनातन धर्म टिकणे महत्त्वाचे असल्याचे सांगतात.