ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पार्टीतील अनेक वरिष्ठ नेत्यांसहीत 30 जणांना आपल्या ट्विटर अकाउंटवरुन "अनफॉलो" केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे.
प्रदेश काँग्रेसनं आयटी सेलच्या परिषदेचं आयोजन केले होते. या परिषदेत वाघेला सहभागी झाले नाहीत. विशेष बाब म्हणजे ऐन परिषदेच्याच वेळी वाघेला यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींसहीत अन्य नेत्यांना "अनफॉलो" करण्याचं पाऊल उचललं आहे.
दरम्यान या परिषदेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि राज्यातील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी सहभागी झाले होते. त्यांचे सोशल मीडिया सांभाळणा-या पार्थेश पटेल यांनी सांगितले की, वाघेल यांनी मला सांगितले की, "सोशल मीडियाचा वापर करणं बंद केले पाहिजे. या पार्श्वभूमीवर 30 ट्विटर हँडलना अनफॉलो करण्यात आले".
गेल्या आठवड्यात वडोदरा शहरातील काही ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरवर वाघेला यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सांगण्यात आल्यानं बराच वाद निर्माण झाला होता. या पोस्टरद्वारे वाघेला भाजपा प्रवेश करणार असल्याचे संकेतही देण्यात आले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पद उमेदवारांच्या शर्यतीत सहभागी होणार नसल्याचे वाघेला यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते.
तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर वाघेला यांना पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवावं, अशी मागणी काँग्रेस पार्टीतील 57 पैकी 36 आमदारांनी केली होती.
"निवडणूक लढवणं महत्त्वपूर्ण नाही"
गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी असे सांगितले की, यंदा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही.
विधानसभा निवडणुकीत अशी कोणती पसंतीची कोणती जागा आहे जेथून निवडणूक लढवण्यास आवडेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता वाघेला म्हणाले की, आयुष्यात आपण ब-याच निवडणुका लढल्या आहेत आणि आता निवडणूक लढवणं इतकं महत्त्वाचं नाही. आता गुजरातमधील लोकं ज्या समस्यांचा सामना करत आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी लढण्याची आता वेळ आहे. माझ्यासाठी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढणं महत्त्वपूर्ण बाब नाही"
तसंच भाजपा प्रवेशच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
Kisne hawa chalaayi?Maine kaha?Amit Shah saamne milne aaye the, mai Congress mein active hoon:Shankarsinh Vaghela on reports of joining BJP pic.twitter.com/63Re9D5ytl— ANI (@ANI_news) May 15, 2017