अमित शहांनी गुजरातमध्ये येऊन 48 तासांमध्ये काँग्रेसला 'असा' दिला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 01:41 PM2018-07-14T13:41:04+5:302018-07-14T13:44:16+5:30
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुरुवारी अहमदाबादला आले आणि जगन्नाथाची पूजा केली. मात्र 48 तासांमध्ये त्यांनी गुजरात काँग्रेसला नवा धक्का दिला आहे.
अहमदाबाद- गुजरात काँग्रेसला भारतीय जनता पार्टीने आता नवा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचा मुलगा आता भाजपामध्ये दाखल आला आहे. महेंद्रसिंह वाघेला हा शंकरसिंह वाघेला यांचे पूत्र असून ते आमदारही होते.
2012 साली महेंद्रसिंह बायाद मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले होते मात्र 2017 साली त्यांनी निवडणूक लढवली नाही. गेल्या पंधरवड्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुंवरजी बावलिया आणि राजकोटचे माजी आमदार इंद्रनील राज्यगुरु यांनी काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. यातील बावलिया यांनी लगेच भाजपामध्ये प्रवेश तर केलाच त्यानंतर थेट कॅबिनेटमंत्री बनविण्यात आले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुरुवारी अहमदाबादला आले आणि जगन्नाथ यात्रेपूर्वी पूजा केली. मात्र त्यांनी गुजरातमध्ये आल्या आल्या 48 तासांमध्ये महेंद्रसिंह वाघेलांना पक्षात घेऊन काँग्रेसला धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांच्या उपस्थितीत महेंद्रसिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
कोण आहेत शंकरसिंह वाघेला?
शंकरसिंह वाघेला हे पुर्वी जनसंघाचे त्यानंतर जनता पार्टीचे आणि नंतर भारतीय जनता पार्टीचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जात. १९९६ साली त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांना एका वर्षासाठी गुजरातचे मुख्यमंत्रीपदही भूषवता आले. १९९७ साली त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन केला. वाघेला हे पाचवेळा लोकसभेत निवडून गेले असून १९८४ ते १९८९ या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. संपुआ१ सरकारमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये ते वस्त्रोद्योग मंत्री होते. सध्या ते गुजरातच्या कापडवंज मतदारसंघातून गुजरात विधानसभेचे सदस्य आहेत.
1995 साली वाघेला यांनी ४७ आमदारांच्या मदतीने भाजपाविरोधात बंड केले होते. हे बंड शांत करण्यासाठी केशुभाई पटेल यांच्याऐवजी सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्यात आले. १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोध्रा मतदारसंघातून लढताना वाघेला यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह पक्ष सोडून राष्ट्रीय जनता पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि त्याच वर्षी आॅक्टोबर महिन्यात कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही झाले. मात्र १९९७ त्यांना पदावरुन बाजूला व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्या जागी दिलिप पारिख हे मुख्यमंत्री झाले. पण पारिख यांचेही सरकार फार काळ चालू शकले राहिले. अखेर १९९८ साली विधानसभेची निवडणूक घेण्यात आली आणि त्यानंतर भाजपा पुन्हा सत्तेमध्ये आला आणि केशुभाई पुन्हा मुख्यमंत्री झाले. भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर त्यांनी गुजरात कॉंग्रेसच्या उच्च वर्तुळात स्थान मिळवले. शक्तीसिंह गोहिल यांच्यानंतर २०१३ साली वाघेला यांच्याकडे विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आली.