सुनील चावके, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : रौप्य महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धापन दिनाचे निमित्त साधून नव्या जबाबदाऱ्यांची घोषणा करताना आपल्या खास शैलीत अनोखा मेळ साधल्याचे दिसून येत आहे. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली तेव्हा सुप्रिया या मुंबईत होत्या तर खास दिल्लीला कार्यक्रमासाठी बोलावून घेण्यात आलेले अजित पवार यांना कोणतीही नवी जबाबदारी देण्यात आली नाही.
शरद पवार यांनी राजीनामा नाट्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची भाकरी फिरविण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर ४० दिवसांनी पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून त्यांनी शनिवारी त्या दिशेने पाऊल टाकले. दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळालेल्या १, केनिंग्ज लेन या पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात २४ वा स्थापना दिवस साजरा केला. या कार्यक्रमासाठी अजित पवार यांना आवर्जून बोलावून घेण्यात आले होते. व्यासपीठाच्या कोपऱ्यावरील शेवटून दुसऱ्या खुर्चीत अजितदादा अलिप्तपणे बसले होते.
ढोल वाजवून आनंद
- सुप्रिया यांच्या नावाची घोषणा करून पवार यांनी आपला राजकीय वारसा निश्चित केला आहे काय? या प्रश्नाचे उत्तर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी स्मितहास्य करत टाळले.
- पवार यांनी पटेल आणि सुप्रिया यांच्या नावांची घोषणा करताच १, केनिंग्ज लेनच्या अंगणात ढोल वाजवून आनंद साजरा करण्यात आला.
- अजित पवार यांच्या नेतृत्वाची पाळेमुळे महाराष्ट्रात घट्ट आहेत. ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. पक्ष स्थापनेपासून त्यांनी अतिशय ताकदीने काम केले असून, आजच्या घोषणेनंतरही त्यांचे महत्त्व अबाधितच राहणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते करत होते.
शरद पवार यांनी २ मे रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर भविष्याची रूपरेषा ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनीच सुप्रियाताईंना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. - वंदना चव्हाण, खासदार, राज्यसभा.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येत असल्यामुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये कामांचे वाटप होणार, याची आम्हाला कल्पना होती. - छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादीची मजबूत बांधणी आवश्यक होती. अजित पवार महाराष्ट्रात भक्कमपणे काम करत आहेत. - सुनील तटकरे, खासदार