नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून शरद पवारांचेही नाव ईडीने दाखल केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असून आता शरद पवार यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका एक महिन्यानंतर होणार असून, त्याआधीच राजकीय संधीसाधूपणाच्या वृत्तीतून ही कारवाई झाली आहे. विविध प्रकरणांत विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोदी सरकार गोवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी याआधी केला होता. आयएएक्स मीडिया घोटाळ्यामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे.विरोधकांना केले जात आहे लक्ष्यपश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर सूडाने कारवाई होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला होता.विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोदी सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानेही याआधी केला आहे.एका प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व अन्य काही प्रकरणांत प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही खटले दाखल करण्यात आले आहेत.
शरद पवारांविरोधात ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल राहुल गांधी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 2:16 AM