मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. मुंबईतील नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून ते राजधानी दिल्लीत जात आहेत. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. त्यामुळे, पवारांच्या दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सातत्याने अस्थीर करण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकारकडून होत असल्याचा आरोप सत्ताधारी नेते करत आहेत. मात्र, काहीही झालं तरी हे सरकार 5 वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल अशी ग्वाही महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार आणि शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात येते. मात्र, पहाटेच्या शपथविधीमुळे राजकारणातील अनिश्चितता सातत्याने वेगळ्या चर्चा घडवून आणते. आता, शरद पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आगामी काळात होत असलेल्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात हा दिल्ली दौरा आहे का, आणखी काही वेगळेच कारण आहे, याची चर्चा होत आहे. मात्र, शरद पवार यांचा हा दिल्ली दौरा नियोजित होता, त्यात तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीही दिल्लीत आहेत. त्यामुळे, काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यासाठीच, शरद पवार दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधी सुत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आता शरद पवारांचंही विमान दिल्लीकडे कूच झालं आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.