शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची मदत घेण्याचा काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विशेष रणनीती आखत आहेत. प्रचारात सहकारी पक्षांकडून काँग्रेस मदत मागण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेला लागून आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकमधील परिसरात मराठी भाषकांची संख्या लक्षणीय आहे. तसेच नोकरी-धंद्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातून कर्नाटकात स्थलांतरित झालेल्यांची संख्याही मोठी आहे. या मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी शरद पवार खूप उपयुक्त ठरतील, असा अंदाज आहे.कर्नाटकमध्ये बाहेरून आलेल्या स्थलांतरितांमध्ये राजस्थानमधील नागरिकांची संख्या सर्वाधिक ४ टक्के इतकी आहे तर उत्तर प्रदेशातून आलेल्यांची संख्या २ टक्के इतकी आहे. हिंदी पट्ट्यातून आलेल्यांची मते मिळवण्यासाठी अखिलेश यांच्या सभा सहाय्यभूत ठरू शकतात. कर्नाटकमध्ये आलेल्या स्थलांतरितांमध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यातील नागरिकांची संख्या सगळ््यात जास्त आहे.यादीत सोनिया गांधींचे नाव नाहीकाँग्रेसच्या संभाव्य स्टार प्रचारकांच्या यादीत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव नाही. प्रकृतीच्या कारणाने त्या प्रचार करणार नसल्याचे कळते. या यादीत राहुल गांधी, डॉ. मनमोहन सिंह, गुलाम नबी आझाद यांच्यासह शरद पवार, अखिलेश यादव आणि राजदचे तेजस्वी यादव यांचा समावेश मात्र आहे. सोमवारपर्यंत प्रचारातील सहभागी नेत्यांची अंतिम यादी तयार करून निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे.
कर्नाटकात काँग्रेसच्या प्रचारात शरद पवार, अखिलेश यादव उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:21 AM