नवी दिल्ली - 2019मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेत येऊ न देण्यासाठी विरोधी पक्षांनी चांगली कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाचा पाडावा करण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये बैठकांवर बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पुढील आठवड्यात विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत. तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी 26 मार्चपासून नवी दिल्लीच्या दौ-यावर असणार आहेत. यावेळी भाजपाविरोधात लढा उभारणा-या विरोधी पक्षांना त्या समर्थन दर्शवणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत. शिवाय, यावेळी अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्या भेट घेणार आहेत. सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतही ममता बॅनर्जींच्या बैठकींचं आयोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, शरद पवार नवी दिल्लीमध्ये बैठकीचं आयोजन करणार आहेत. या बैठकीमध्ये 2019 लोकसभा निवडणूक या महत्त्वपूर्ण मुद्यावर चर्चा होणार आहे. निवडणुकीतील रणनीतीवर विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेससहीत सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात आले आहे.
विरोधकांनो देशाला वाचवण्यासाठी एक व्हा - ममता बॅनर्जी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपाविरोधात लढ्याचे नेतृत्त्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहनदेखील केले होते. तेलुगू देसमच्या रालोआतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे स्वागत करत ममता बॅनर्जींनी देशाला संकटातून वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या निर्णयांची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. सर्व विरोधी पक्षांनी अत्याचार, आर्थिक संकट, राजकीय अस्थिरतेच्याविरोधात एकत्र यावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले होते.