शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी; खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “...त्यामुळेच हे शक्य झाले”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 04:14 PM2024-07-03T16:14:29+5:302024-07-03T16:16:42+5:30
NCP SP MP Amol Kolhe: एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी या पदावर पोहोचू शकतो, अशी कल्पनाही कोणी केली नसेल, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
NCP SP MP Amol Kolhe: संसदेचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान इंडिया आघाडी आणि एनडीएचे नेते यांच्या जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदी यांनी या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेत प्रत्युत्तर दिले. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शरद पवारांनी दिलेल्या या जबाबदारीबाबत अमोल कोल्हे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे शरद पवार गटासोबत राहिले. लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत अमोल कोल्हे विजयी झाले. यानंतर आता शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे
अमोल कोल्हे यांनी एक्सवर एक फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले. ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचे बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय शरद पवार , सुप्रिया सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार!, असे अमोल कोल्हे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले.