NCP Sharad Pawar Group:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर अजित पवार गटाने दावा केला. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी अजित पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तसेच अजित पवार गटाकडे नेमके किती आमदार आहे, हे जाहीर करावे, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली.
अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल, मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. यावेळी अजित पवार गटाकडून शिवसेना आणि सादिक अली प्रकरणाता दाखला देण्यात आला. तसेच शरद पवार गटावर अनेक आरोप करण्यात आले. आमच्याकडे दीड लाखाहून अधिक शपथपक्ष आहेत. शरद पवारांकडे ४० हजार शपथपत्रे आहेत, असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला. तसेच नियमानुसार नियुक्त्या केल्या जात नव्हत्या. शरद पवार आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत आहेत. जे स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात, असा सवाल करत, पदाधिकाऱ्यांच्या फक्त नियुक्त्या व्हायच्या, निवडणूक व्हायच्या नाहीत. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले. ज्यांची निवड पवारांनी केली तेच पवारांची निवड कशी करू शकतात? अशी विचारणा अजित पवार गटाकडून करण्यात आली. यानंतर शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला.
अजित पवार गटाकडे किती आमदार हे जाहीर करावे
अजित पवार गटाकडे किती आमदार हे जाहीर करावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली. तसेच शरद पवार यांची निवड नियमानुसार केल्याचे निवडणूक आयोगासमोर सांगण्यात आले. अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडली. अजित पवार गटाने बहुसंख्य आमदार आमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. पण बहुसंख्य आमदार कोण आहेत? ते सांगा, असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने चारवेळा संधी दिली नाही. त्यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे अजित पवार गटाने सांगितले आहे. एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही असा दावा अजित पवार गटाने केला आहे.