नवी दिल्ली : चीनसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेली बैठक ही व्हर्च्युअल न घेता समोरासमोर घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र, कोणत्याही विरोधी पक्षाने या मागणीला पाठिंबा दिला नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावताना सांगितले की, कोरोनाच्या काळात व्हर्च्युअल बैठक ही समोरासमोर घेतल्या जाणाऱ्या बैठकीसारखीच प्रभावी आहे.राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, शरद पवार यांनी याची आठवण दिली की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २२ मे रोजी २२ नेत्यांची व्हर्च्युअल बैठक घेतली होती. भाकपचे नेते डी. राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, समोरासमोर बैठक घेण्यास माझा आक्षेप नव्हता. मात्र, अन्य नेते यासाठी तयार नव्हते. डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन हेही यासाठी सहमत नव्हते.सरकारने बैठक घेण्याचे ठरविल्यानंर सोनिया गांधी यांनी अनेक नेत्यांशी संपर्क साधला होता. मात्र, प्रमुख पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. चीनबाबत राहुल गांधी आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर काही नेते सहमत नव्हते. शरद पवार यांनी स्पष्ट केले की, हा आंतरराष्ट्रीय कराराचा मुद्दा आहे. या संवेदनशील मुद्याचा सर्वांनी सन्मान करायला हवा. याच मुद्यावरुन सोनिया गांधी यांनी सरकारला अनेक सवाल केले होते.
India China FaceOff: 'या' संवेदनशील मुद्द्याचा सर्वांनी सन्मान करायला हवा- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 2:48 AM