लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याची दिशा निश्चित करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा शनिवारी येथे केली.
महाराष्ट्राची निवडणुकांसह सर्व जबाबदारी खा. सुप्रिया सुळे यांच्या खांद्यांवर टाकली आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांना कोणतीही नवी जबाबदारी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आपल्या राजकीय उत्तराधिकाऱ्याविषयीचे स्पष्ट संकेत दिल्याचे मानले जात आहे.
पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून पवार यांनी केलेली ही घोषणा अनपेक्षित ठरली. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील वगळता व्यासपीठावर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, वंदना चव्हाण, मोहम्मद फैझल आदी नेते होते.
प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, राजस्थान, झारखंड ही राज्ये आणि राज्यसभेतील कामे. सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र, पंजाब व हरयाणा ही राज्ये. लोकसभेतील कामे, महिला आणि युवक विभागाचे काम. सुनील तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस ओडिशा आणि पश्चिम बंगालसोबत शेती आणि अल्पसंख्याकांची जबाबदारी. जितेंद्र आव्हाड : बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक ही राज्ये. कामगार आणि इतर मागासवर्गीयांची जबाबदारी. डॉ. योगानंद शास्त्री, के. के. शर्मा, नरेंद्र वर्मा, मोहम्मद फैझल, एस. आर. कोहली, नसीम सिद्दीकी यांना पक्षांतर्गत जबाबदाऱ्या.
...अन् अजित पवार निघून गेले
गॉगल लावून बसलेले अजित पवार उकाड्याच्या वातावरणात झालेल्या भाषणांमुळे वैतागलेले दिसले. कार्यक्रम संपताच ते बाहेर पडले आणि कोणाशीही न बोलता काही क्षणातच गाडीत बसून निघून गेले. पत्रकारांनाही त्यांनी टाळले. त्यानंतर काही तासांनी त्यांनी ट्वीट केले.
पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र... नजरेसमोर
राष्ट्र...’ हा विचार घेऊन रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देईल. - अजित पवार यांचे ट्वीट