नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यात सध्या असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, या भेटीमध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न आपण पंतप्रधान मोदींकडे मांडला. तसेच, मोदींना पुण्यातील एका कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले आहे.
शरद पवारांनी महाराष्ट्रात ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीकडे मोदींचे लक्ष वेधल्याचं ट्विटरवरून सांगितले. तर, या भेटीदरम्यान कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचेही माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले. यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात अकल्पनीय असे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा फटका 325 तालुक्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे 54.22 लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. ही बाब मी मोदींच्या कानावर घातली आहे, असे पवारांनी ट्विटरवरुन सांगितले. त्यासोबत मोदींना पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या कार्यक्रमाचेही निमंत्रण दिलंय.
पुण्यातील वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत खासर उद्योगावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. शरद पवारांनी मोदींना या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलंय. 'सस्टेनेबल इनोव्हेशन अँड डायव्हर्सीफिकेशन इन शुगर अँड अॅलाईड इंडस्ट्री' हा या परिषदेचा विषय आहे. यापूर्वी सन 2016 मध्ये या इंस्टीट्यूटमध्ये साखर विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला 22 देशांमधील उद्योजक उपस्थित होते. त्याही, परिषदेचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे, पुढील वर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाला आपण विशेष अतिथी म्हणून यावे, असे निमंत्रण शरद पवार यांनी मोदींना दिले आहे. दरम्यान, इंडियन शुगर मिल असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार कार्यरत आहेत. या असोशिएशनकडून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.