"शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत"; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:23 PM2023-10-18T12:23:24+5:302023-10-18T12:24:05+5:30
गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली – कोळशाच्या किंमतीवरून आलेल्या रिपोर्टनंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोळशाच्या किंमती चुकीच्या दाखवून वीजबिलात फसवणुकीच्या माध्यमातून उद्योगपती गौतम अदानी यांनी विजेचे दर वाढवले. जनतेच्या खिशातून १२ हजार कोटी रुपये थेट अदानींनी घेतले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही शरद पवारांना प्रश्न का नाही विचारत, कारण इंडिया आघाडीचा विरोध असतानाही ते अदानींची भेट घेतात. त्यावर राहुल गांधींनी शरद पवारांना मी कुठलेही प्रश्न विचारले नाहीत, यामागे कारण आहे. शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नाहीत असं उत्तर दिले आहे. फायनेन्शियल टाइम्स रिपोर्टमध्ये अदानींच्या कंपनीने कोळशाची कमी दरात खरेदी करून तिचे दर जास्त दाखवले असा दावा करण्यात आला आहे.
तसेच शरद पवार पंतप्रधान नाहीत. पवार अदानींना वाचवत नाही. त्यांना पंतप्रधान मोदी वाचवत आहेत. त्यामुळे मी शरद पवारांना नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारतोय. जेव्हा शरद पवार पंतप्रधान बनतील आणि ते अदानींना वाचवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांनाही मी प्रश्न विचारेन. सध्या पंतप्रधानांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न आहे असं राहुल गांधींनी सांगितले.
LIVE: Media Interaction | AICC HQ, New Delhi https://t.co/a33NF3L2Yu
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 18, 2023
इतकेच नाही तर गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात. अदानींची सुरक्षा भारताचे पंतप्रधान करत आहेत. लोकं वीज वापरतात ते पैसे अदानींना मिळतात. गौतम अदानी हे कोळसा खरेदी अतिरिक्त कमाई करतायेत. परदेशी वृत्तपत्र फायनेन्शियल टाइम्सच्या रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधींनी थेट वीजचोरीचे हे प्रकरण असल्याचे म्हटलं. अदानींमध्ये असं काय खास आहे ज्यामुळे भारत सरकार त्यांची चौकशी करत नाही असा प्रश्न राहुल गांधींनी केला. अदानींना कुणी प्रश्न विचारू शकत नाही. त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे हे देशातील संपूर्ण जनता जाणते असंही त्यांनी म्हटलं.