देशात पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज (गुरुवारी) सायंकाळी काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीकडे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विखुरलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, शरद पवार मुंबईहून येऊन बैठकीत सहभागी झाले, याचा मला आनंद आहे. तरुणांना रोजगार, महागाई यासंदर्भात चर्चा झाली. आपण एकत्रितपणे देशहितासाठी काम करू. हा विचार शरद पवार यांचाही आहे.
पवार म्हणाले, यावेळी शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. “मल्लिकार्जुन खर्गे यांनी जे सांगितलं तेच विचार आमच्या सगळ्यांचे आहेत. पण फक्त विचार करुन फायदा नाही. हे प्रत्यक्षात व्हायला हवं. त्यामुळे त्या दृष्टीकोनाने आता कामही होत आहे. खर्गे यांनी बैठक घेतलीय. ही सुरुवात आहे. यानंतर इतर विरोधी पक्षही एकत्र येतील. आम्ही ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्याशीही चर्चा करू आणि ऐक्यासाठी प्रयत्न करू.
...म्हणून महत्वाची मानली जात आहे ही बैठक -बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच बरोबर, अदानी प्रकरणावर शरद पवार यांनी नुकतीच काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे