Sharad Pawar on Lakhimpur Violence: देशातील शेतकरी शांततेतच आंदोलनाचा प्रयत्न करतो. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण ज्यापद्धतीनं उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांवर हल्ला झाला त्यावरुन केंद्रातील सरकारची नियत कळाली. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून काहीही करणार का? असा हल्लाबोल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर घटनेवर संताप व्यक्त केला.
शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक दिल्याच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "लखीमपूरमध्ये ज्यापद्धतीनं शेतकऱ्यांवर हल्ला केला गेला त्याचा मी निषेध व्यक्त करतो. फक्त निषेध केल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांना शांती मिळणार नाही. घटलेल्या घटनेची संपूर्ण जबाबदारी भाजपा, उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारची आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्त्वात सखोल चौकशी केली गेली पाहिजे. आरोपींना तातडीनं कठोर शिक्षा झाली पाहिजे", अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली.
सत्तेचा गैरवापर करू नका, नाहीतर..."शेतकऱ्याला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांची अशापद्धतीनं गळचेपी करणं योग्य नाही. या घटनेनं केंद्र सरकारची नियत कळाली आहे. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून त्याचा गैरवापर करू नका. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर तुम्हालाच ते भारी पडले. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यात तुम्हाली कधीच यश येणार नाही", असंही शरद पवार म्हणाले.
लखीमपूर घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची आणि संवेदना व्यक्त करण्याचाही अधिकार दिला जात नाही. हे नेमकं कोणत्या पद्धतीचं राज्य आहे? विरोधी पक्षाच्या नेत्यांची अडवणूक करता, त्यांना कोंडून ठेवलं जातंय हे योग्य नाही. देशाचा शेतकरी वर्ग एकटा नाही. संपूर्ण देश बळीराजाच्या पाठिशी उभा आहे, असं शरद पवार म्हणाले.
जालियनवाला बाग हत्याकांडासारखी परिस्थितीशरद पवार यांनी लखीमपूरमधील घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडशी केली आहे. उत्तर प्रदेशात सध्या जालियनवाला बाग हत्याकांडासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारला संवेदनाच उरलेल्या नाहीत. हुकूमशाही राजवटीसारखं राज्य चालवलं जात आहे, असंही पवार म्हणाले.