Sharad Pawar on Gautam Adani: 24 जानेवारीला अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गची रिपोर्ट आली आणि भारतात मोठा राजकीय भूकंप आला. रिपोर्टमध्ये अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. शेअर बाजारापासून संसदेपर्यंत एकच गोंधळ उडाला. गौतम अदानी यांचीच देशभरात सर्वत्र चर्चा होऊ लागली. संसदेत विरोधकांनी सरकारवर टीका करत जेपीसी मागणी केली. आता या सर्व गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
अदानींना टार्गेट केलेएनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अदानींना क्लीन चिट दिली. हिंडेनबर्गवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, या रिपोर्टमधून अदानी समूहाला टार्गेट करण्यात आल्याचे दिसते. मात्र, अदानी समूहाने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. याआधीही अशी विधाने समोर आली आणि अनेक दिवस संसदेत गदारोळ झाला, मात्र यावेळी अदानी प्रकरणाला जास्त महत्व दिले गेले. अदानीबाबत विधाने करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
जेपीसी चौकशीची गरज नाही अदानी प्रकरणात जीपीसी चौकशीबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेत प्रचंड गदारोळ केला. याबाबत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची युती आहे. पण, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही. जेपीसी चौकशी झाली तरी देखरेख सत्ताधारी पक्षाकडे असेल आणि सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे. अशा परिस्थितीत सत्य कसे बाहेर येईल? आता अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत जेपीसी चौकशीची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
आम्हीही तेव्हा टाटा-बिर्लांवर टीका करायचो
पवार पुढे म्हणतात, राजकारणात आल्यावर आम्हीही सरकारच्या विरोधात बोलायचो. तेव्हा आम्ही टाटा-बिर्लांचे नाव वापरायचो. त्यांचे योगदान आम्हाला माहित होते, पण तरीही आम्ही त्यांच्या विरोधात बोलायचो. आज टाटा-बिर्ला नव्हे तर अंबानी-अदानींच्या नावाची चलती आहे. म्हणूनच जेव्हा सरकारवर हल्लाबोल करायचा असतो, तेव्हा विरोधक अदानी-अंबानींचे नाव घेतात. तुमचं काही चुकलं असेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण विनाकारण हल्ला करणं माझ्या समजण्यापलीकडचं आहे, असे म्हणत शरद पवारांनी काँग्रेसलाच चिमटा काढला.
देशाच्या विकासात अंबानींचे योगदानयावेली शरद पवार यांनी अंबानी समूहाचे कौतुक केले. पवार म्हणाले की, पेट्रोकेमिकल क्षेत्रात, वीज क्षेत्रात अंबानींचे योगदान मोठे आहे. देशाला त्या गोष्टींची गरज नव्हती का? या लोकांनी जबाबदारी घेतली आणि या क्षेत्रांसाठी काम केले. त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यामुळे त्यावर टीका करणे मला योग्य वाटत नाही, असेही पवार म्हणाले.