ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - देशातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणा-या 'पद्म' पुरस्कारांच्या यादीतील संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली असून त्यामध्ये ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, गुगलचे सुंर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला तसेच पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक यांची नावे आघाडीवर आहेत. 'हिंदुस्थान टाईम्स' या वृत्तपत्राने हे वृत्त दिले असून त्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या नावाचाही समावेश असल्याचे समजते. १७३० नामांकनांमधून सरकारने १५० मान्यवरांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. 'प्रजासत्ताक दिना'च्या पूर्वसंध्येला पुरस्काराने गौरवण्यात येणा-या व्यक्तींच्या नावांची घोषणा करण्यात येईल.
तर मनोरंजन क्षेत्रातून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता मनोज वाजपेयी, गायक-संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन, सोनू निगम, कैलाश खेर यांच्या नावाचाही समावेश असल्याचे समजते.
फक्त राज्यातीलच नव्हे तर देशभरातील राजकारणातील शरद पवारांचा वरचष्मा सर्वश्रुत आहे. पवारांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसेच सर्वपक्षीय नेते आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
१९५४ सालापासून ४३२९ नागरिकांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यामध्ये 'पद्मश्री', 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' आणि 'भारतरत्न' या सन्मानांचा समावेश असतो. मात्र काही वर्षांपूर्वी या पुरस्कारांवरून वाद निर्माण झाला होता. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी 'पद्म भूषण' पुरस्कार मिळवण्यासाठी आपल्याकडे मदत मागितली होती असा दावा केंद्रीय वाहतूक आणि रस्ते, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. त्यामुळे या पुरस्कारांच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.