शिवसेनेकडून प्रस्तावच नाही तर पुढे कसं जाणार? शरद पवारांनी 'सस्पेन्स' वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:59 PM2019-11-04T18:59:21+5:302019-11-04T19:21:10+5:30

 महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली.

Sharad Pawar raises 'suspens' on Maharashtra's politics | शिवसेनेकडून प्रस्तावच नाही तर पुढे कसं जाणार? शरद पवारांनी 'सस्पेन्स' वाढवला

शिवसेनेकडून प्रस्तावच नाही तर पुढे कसं जाणार? शरद पवारांनी 'सस्पेन्स' वाढवला

Next

नवी दिल्ली -  महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सस्पेन्स वाढवणारे विधान केले आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. शिवसेनेकडून तसा प्रस्तावच आलेला नाही, मग त्यावर विचार कसा करणार, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सोनिया गांधी यांना पुन्हा भेटणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय खेळ अजून काही काळ सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सोनिया गांधी यांना भेटल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की,''राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस आणि एनसीपीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढे काय करायची याबाबत रणनीती ठरवली होती. त्यानंतर आज मी सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी हेसुद्धा उपस्थित होते.'' 

यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही भाष्य केले.''शिवसेना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र सरकार स्थापन करण्याबाबत किंवा पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेने अद्याप विचारणा केलेली नाही. आम्हीही कुणाशी संवाद साधलेला नाही. तसेच कुणाशी बैठकही घेतलेली नाही, असे पवार यांनी सांगितले.  

''महाराष्ट्रामध्ये आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे. सरकार स्थापन करण्याइतपत संख्याबळ आमच्याकडे नाही. राज्यात भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सरकार बनवण्याची जबाबदारी भाजपाची आहे.'' असे पवार म्हणाले. दरम्यान, आज झालेल्या सोनिया गांधींसोबतच्या चर्चेनंतर आपण राज्यातील नेत्यांशी पुन्हा एकदा चर्चा करणार असून, त्यानंतर पुन्हा एकदा सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. 

Web Title: Sharad Pawar raises 'suspens' on Maharashtra's politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.