ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार होण्यासाठी ठेवलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे. शरद पवार यांनी प्रस्ताव धुडकावून लावला असल्याने काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला आहे.
"गेल्या महिन्यात पार पडलेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी शरद पवार साहेबांना राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार होण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांनी तो धुडकावून लावला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी माझा विचार केला जाऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं आहे", अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. "आपण ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं याआधीही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे", असं नवाब मलिक बोलले आहेत.
शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी घ्यावी, अशी यूपीएच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे. परंतु काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले होते की, "एनडीएकडे राष्ट्रपदीपदासाठी स्वत:चे उमेदवार जिंकवण्यासाठी आवश्यक बहुमत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठे उलटफेर होण्याची शक्यता नाही".
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यासाठी उमेदवार उभा करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने घेतली असून यासाठी सर्व विरोधी पक्षांशी चर्चा केली जात आहे. यासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. यानंतर ममतांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली.
सोनिया गांधी यांनी यासंबंधी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, सिताराम येचुरी आणि ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपत आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा हाती असलेल्या एनडीएने मात्र अद्याप उमेदवाराबाबत कोणतीही कल्पना दिलेली नाही.