नवी दिल्ली - मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिपदांच्या समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेत तिढा निर्माण झाल्याने राज्यात नव्या सरकारचा शपथविधी अद्याप होऊ शकलेला नाही. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून संजय राऊत यांनी शिवसेनेकडे 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता शरद पवार यांनी गमतीदार प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी हा आकडा कुठून आणला हे माहिती नाही. कदाचित भाजपाचे काही आमदार त्यांच्या बाजूने असावेत, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी प्रासरमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेकडून आमच्याकडे पाठिंब्याबाबत विचारणाच झालेली नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याच्या संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विधानाबाबत विचारणा केली अता शरद पवार म्हणाले की, "संजय राऊतांनी हा आकडा कुठून आणला हे माहिती नाही. कदाचित भाजपाचे काही आमदार त्यांच्या बाजूने असावेत. संजय राऊत हे माझे राज्यसभेतील सहकारी आहेत. त्यामुळे आम्ही भेटत असतो. मात्र आमच्या नुकत्याच झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही,'' असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सस्पेन्स वाढवणारे विधान केले. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. शिवसेनेकडून तसा प्रस्तावच आलेला नाही, मग त्यावर विचार कसा करणार, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सोनिया गांधी यांना पुन्हा भेटणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय खेळ अजून काही काळ सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजय राऊतांनी 170 आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून आणला? शरद पवारांनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 8:44 PM