सुरेश भुसारीनवी दिल्ली :
राष्ट्रपतिपदाचा विरोधकांचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता शरद पवार यांनी नाकारली तरी गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडीवरून विरोधकांचा उमेदवार ठरविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे दिल्लीत जोरदार पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.
भेटीगाठींचा सिलसिला>> अनेक मुद्यांवर आतापर्यंत विरोधकांमधील बेकी समोर आली आहे. परंतु राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्व विरोधक एकाच मार्गाने जाण्याच्या विचारात असल्याने या वेळी विरोधकांची एकी अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे.
>> शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. पवार यांचे दिल्लीत आगमन झाल्यानंतर भाकपचे नेते डी. राजा, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी व आपचे खासदार संजय सिंग यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
>> बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतही पवार यांनी चर्चा केली. या वेळी राष्ट्रपतिपदाच्या विरोधकांच्या संभाव्य उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली.
विरोधकांमध्ये एकीमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याच मुद्यावर बुधवारी १५ जूनला विरोधी नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीला डावे व काँग्रेसच्या नेत्यांसह बहुतेक विरोधी पक्षाचे नेते हजर असतील. यापूर्वी काँग्रेसने बोलाविलेल्या बैठकांना आप व ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावली नव्हती. जुने वैमनस्य मागे ठेवून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार जयराम रमेश व रणदीपसिंग सुरजेवालाही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
पवार सेनेवर नाराज राज्यसभेतील निवडणुकीमुळे शरद पवार शिवसेनेवर नाराज आहेत. ही नाराजी दूर व्हावी, यासाठी शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार यांचे नाव समोर करीत असल्याचा टोला केंद्रीय सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.