मुंबई - इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर 1977 मध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी विरोधकांनी इंदिरा गांधीचे सरकार कोसळवले होते. सध्या 1977 सारखीच परिस्थिती झाली आहे. सध्याचे सरकारही एकखांबी नेतृत्व चालत आहे. 1977 मध्ये ज्याप्रमाणे विरोधकांनी एकजूट होऊन सत्ताधाऱ्यांना खाली खेचले तसेच आताही सर्व विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. 1977 सारखी पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांत दहा पैकी 9 जागी भाजपा पराभूत झाली. त्यामुळे बदलत चाललेले जनमत लक्षात घेऊन आता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे, आणि ही विरोधकांसाठी मोठी गोष्ट आहे असेही पवार म्हणाले. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या भाजपाने विरोधाकांना मान दिला पाहिजे आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये विराधकांना मानाचे स्थान द्यावे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
शेतक-यांना दिलेली आश्वासने सरकाराने पाळली नाहीत. शेतक-यांबाबत सरकारची नियत चांगली दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांनी त्यांचे प्रश्न सुटेपर्यंत टोकाची भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. चार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के फायदा हा शेतीमालाच्या किमतीचा आधार धरला जाईल आणि त्या पद्धतीने पाऊले टाकली जातील असे जागोजागी सांगत होते. पण गेल्या चार वर्षात याची अंमलबजावणी झाली नाही. दिल्लीसह दक्षिण भारत, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतक-यांच्या या संघर्षात सर्वांनाच उतरावे लागेल. त्यांना पाठबळ द्यावे लागेल. शेतक-यांनी रस्त्यावर दूध आणि भाजीपाला फेकण्याऐवजी गोरगरिबांना द्यावा. जेणेकरून कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही आणि गरीबांची सहानुभूती आपल्याला मिळेल. शेतक-यांनी या आंदोलनात सामान्य माणसाला त्रास होईल असे कोणतेही काम करू नये असे आवाहनही पवार यांनी केले.