नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाला एकत्रित आणण्यासाठी ब्रेकफास्ट डिप्लोमासीचा अवलंब केला आहे. मोदी सरकार घेरण्यासाठी काँग्रेससह १४ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा(Amit Shah) यांची भेट घेतली. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र, स्वत: शरद पवार यांनीच या भेटीचा खुलासा केला आहे.
अमित शहा-शरद पवार यांच्या भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शहांसोबत भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये केवळ सहकार क्षेत्रावरच चर्चा होणार की पडद्यामागून अन्य काही राजकीय डाव साधला जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शहा-पवार भेटीत नेमकं काय घडलं आणि त्याचा भविष्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे सांगणं आत्ता कठीण आहे. मात्र, स्वत: शरद पवार यांनीच भेटीचं स्पष्टीकरण दिलंय.सुरुवातीला मी देशाचे पहिले सहकारमंत्री नियुक्त झाल्याबद्दल केंद्रीयमंत्री अमित शहांचे अभिनंदन केले. त्यानंतर, या बैठकीत साखर उत्पादनासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा झाली. देशातील सद्यस्थिती आणि जास्त साखर उत्पादनामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरही चर्चा झाली. साखरेचा एमएसपी आणि साखर कारखान्यांच्या आवारात इथेनॉल उत्पादन युनिट उभारण्यासाठी परवानगी, यांसारख्या दोन गंभीर समस्याही आम्ही नव्या सहकारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.