Sharad Pawar vs Amit Shah, Piyush Goyal: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचा, 'भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार' असा उल्लेख केला होता. या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी 'सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे', असे म्हणत अमित शाहांवर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी त्यांच्या विधानाबाबत अमित शाह यांची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
"अमित शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषमुक्त ठरवले होते. अमित शाह यांना गुंतविण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले होते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. त्यावेळी शरद पवार सहभागी असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार केंद्रातील सत्तेत होते. त्यावेळच्या युपीए सरकारने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अमित शाह यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना निर्दोष ठरविल्यामुळे शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी", असे पीयूष गोयल म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतही मांडले मत...
"केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला नसून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या वाढवण बंदरासाठी ७६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे खात्यासाठीच्या तरतुदीत महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने वाटचाल सुरु झाली आहे. देशभरात १२ इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार आहेत. त्यात राज्यातील दिघी येथे उभ्या राहणाऱ्या इंडस्ट्रिअल पार्कचाही समावेश आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी ११ लाख कोटी एवढी विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. याचाही फायदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे," अशा शब्दात पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पाबाबत मत मांडले.