नवी दिल्ली-
राज्यात शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडत असताना नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचं विधान केलं आहे. शिवसेनेचे काही आमदार नाराज असले तरी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही. शिवसेनेचा अंतर्गत विषय लवकरच सुटेल असा विश्वास असल्याचं शरद पवार म्हणाले. यावेळी महाविकास आघाडी सरकार कोसळलं तर भाजपाला पाठिंबा देणार का असं विचारलं असताना शरद पवार यांची प्रतिक्रिया खूप सूचक ठरली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० ते ३५ आमदार आहेत आणि त्यांची नाराजी दूर झाली नाही तर सरकार कोसळू शकतं. सरकार कोसळलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाशी संपर्क साधणार का? असं शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी प्रश्नावरच आक्षेप घेतला. "तुम्ही असा प्रश्नच कसा विचारू शकता? आम्ही विरोधी बाकावरही बसू शकतो", असं शरद पवार म्हणाले. म्हणजे राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही असं विचारलं असता शरद पवार यांनी थेट नकार देणं टाळल्याचं दिसून आलं. सरकार आजही ठाम आहे आणि यापुढेही राहिल असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
क्रॉस वोटिंग झालं तरी सरकार चालतं"विधान परिषद निवडणुकीत आमच्यात अजिबात नाराजी नाही. आमच्या पक्षातील आमदारांनी शिस्तबद्धपणे मतदान केलं आहे. ज्या पक्षांची मतं फुटली आहेत त्यांचेही उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसचा एक उमेदवार पडला आणि त्याबाबत त्यांचीही पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. क्रॉस वोटिंग झालं तरी सरकार चालतं हा माझा ५० वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे याचा काही परिणाम होणार नाही", असं शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार बनण्याआधी देखील अशी बंडाळी झाली होती. पण काही होऊ शकलं नाही. सरकारनं यशस्वीरित्या अडीच वर्ष पूर्ण केल्यामुळे अशी कारस्थानं केली जात आहेत, असंही शरद पवार म्हणाले. सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर काहीतरी मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे, अस शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.