नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्याने राज्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले. शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावर मंगळवारी सकाळी ईडीने कारवाई केल्यानंतर मोदी-पवार भेट झाली त्यामुळे या कारवाईबाबत बैठकीत काही चर्चा झाली का? यावरही प्रश्न होता. परंतु मोदींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सर्व चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे.
शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले की, लक्षद्विपमध्ये प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी चुकीचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे लक्षद्विपमधील नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी मोदींची भेट घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीबाबतही चर्चा करण्यात आली. १२ आमदारांच्या प्रश्नावर मोदी विचार करून निर्णय घेतील. मागील अनेक दिवसांपासून या जागा भरल्या जात नाहीत. तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत यांच्यावरील अन्यायाची बाब मोदींना कळवलं. राऊत यांची संपत्ती जप्त करणं योग्य नाही. नवाब मलिकांवरील संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच संजय राऊतांवर कारवाई करण्याची गरज काय होती?, राष्ट्रवादी-शिवसेना भाजपाविरोधात उभी आहे. राष्ट्रवादी कधीच भाजपासोबत नव्हती. भाजपाविरोधात पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत भाजपा प्रदेशाध्यक्षांनी जर भाजपाला मतदान दिले नाही तर ईडी घरी येऊ शकते असं विधान केले होते. महाविकास आघाडीची एकत्र बैठक होईल. त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालेल. पुढील विधानसभा निवडणुकीतही मविआ जिंकेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. कॅबिनेटमध्ये बदलाची शक्यता नाही. काही जागा रिक्त आहेत. महाविकास आघाडीत चर्चा करून त्या जागा भरल्या जातील.
राज ठाकरेंच्या मुद्द्यावर भाष्य करणार नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्याबाबत जे विधान केले त्यावर बोलणार नाही. देशात भाजपा सत्तेत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांचीही आहे. परंतु राज ठाकरेंच्या भाषणानंतर अनेक भाजपा नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ भाष्य केले. राज ठाकरे हे भाजपाला मतदान देऊ नका सांगत होते. परंतु आता त्यांच्यात बदल झालाय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला.