शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, अजित पवार गटाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 04:55 PM2023-10-09T16:55:40+5:302023-10-09T16:56:15+5:30
एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही. पक्षात हेच सुरू होते, असा आरोप अजित पवार गटाने केला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावरुन आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने मोठा आरोप केला. शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते. तसेच, पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव होता. एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही. पक्षात हेच सुरू होते, असा आरोप अजित पवार गटाने केला आहे.
अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत. तर शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील निवडणूक आयोगात उशिराने उपस्थित राहिल्याने सुनावणी 15 मिनिटे उशिराने सुरु झाली. अजित पवार गटाने गेल्या सुनावणीवेळी देखील युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज पुन्हा निवडणूक आयोग अजित पवार गटाची भूमिका मांडली. यावेळी अजित पवार गटाकडून शिवसेना आणि सादिक अली प्रकरणाता दाखला देण्यात आला. विधीमंडळातील बहुमत आमच्याकडे आहे. त्याचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागेल. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला.
याचबरोबर, शरद पवार हे घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, पक्षात लोकशाहीचा अभाव होता असा मोठा दावा अजित पवार गटाने केला. आमदारांची संख्या आपल्याकडे मोठी आहे, त्यामुळे पक्ष आमचाच आहे असा दावाही त्यांनी केला. याशिवाय, पक्षाची घटना आणि कायद्यानुसार निर्णय झाला नाही. पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. यावेळी अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी पक्षाची घटना वाचवून दाखवली.
यावेळी अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी पक्षाची घटना वाचवून दाखवली. तसेच, शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवड निवडणूक घेऊन झालेली नाही. त्यामुळे निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांची नेमणूका करत होता. ते योग्य आहे का? शरद पवार एकदाही निवडून आले नाहीत. मग त्यांची नियुक्ती वैध कसं म्हणता येईल? अजित पवार गटाची नियुक्ती कायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकिल मनिंदर सिंह यांनी केला. याशिवाय, आमच्याकडे एक लाखाहून शपथपत्रं आहेत. शरद पवारांकडे 40 हजार शपथपत्रं आहेत, असे अजित पवार गटाने सांगितले. तसेच, पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता. राष्ट्रवादी चिन्ह आम्हाला मिळायला हवे, असेही अजित पवार गटाने सांगितले.