शरद पवारांचे PM मोदींना थेट चॅलेज, अजित पवारांना कोंडीत पकडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 08:12 PM2023-08-30T20:12:37+5:302023-08-30T20:30:30+5:30
शरद पवार म्हणाले, मी प्रधानमंत्र्यांचं भोपाळचं भाषण ऐकलं, त्यांनी काँग्रेसवर टीका केली भ्रष्टाचाराची, राष्ट्रवादीवरही केली.
मुंबई - इंडिया आघाडीतील पक्षांची मुंबईत २ दिवसीय बैठक होत आहे. या बैठकीसाठी देशातील विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते मुंबईत दाखल होत आहेत. महाविकास आघाडीकडे या बैठकीचं आयोजन आहे. या बैठकीबाबत माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली होती. या बैठकीत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेस व राष्ट्रवादीवार भ्रष्टाचार व घराणेशाहीचा आरोप होत असल्याचा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर, उत्तर देताना पवार यांनी मोदींना थेट चॅलेंजच दिलं आहे.
शरद पवार यांनी मोदींना चॅलेंज देत एकप्रकारे अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलंय. कारण, मोदींनी भाषणात उल्लेख करताना सहकार आणि इरिगेशनचा उल्लेख केला. त्यावेळी, हे दोन्ही खात्याचा कारभार अजित पवार यांच्याकडेच होता. त्यामुळे, शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचं या उत्तरातून दिसून येतंय.
शरद पवार म्हणाले, मी प्रधानमंत्र्यांचं भोपाळचं भाषण ऐकलं, त्यांनी काँग्रेसवर टीका केली भ्रष्टाचाराची, राष्ट्रवादीवरही केली. राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि इरीगेशन घोटाळा या दोन गोष्टी कटाक्षाने सांगितल्या. माझा प्रधानमंत्र्यांना एकच आग्रह आहे. ते प्रधानमंत्री आहेत, देशाचे. जिथं सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तूस्थिती समाजासमोर ठेवावी, अशी मागणीच शरद पवार यांनी केली आहे. नुसता आरोप करण्यात अर्थ नाही. सत्ता तुमच्या हाती आहे, त्यामुळे चौकशी करा आणि संपूर्ण देशाला सांगा वस्तुस्थिती काय आहे, असे चॅलेंजच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे.
शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम केलंय. पंतप्रधानांकडे भ्रष्टाचाराच्या आरोपावरील चौकशी करण्याची मागणी करत एकप्रकारे अजित पवार यांना अडचणीत आणण्याची खेळी केल्याचं दिसून येतं. त्यामुळे, आता शरद पवारांच्या मागणीवर केंद्र सरकार काय पाऊलं उचलतंय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.